Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | घटस्थापनेच्या दिवशी शेतकरी राजाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करावे लागणे  हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रा.भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले,  उपोषण स्थळाला भेट दिल्यानंतर प्रतिभा शिंदे ह्या बोलत होत्या. याप्रसंगी छोटु पाटील,  चंद्रभान पवार,  संजय बडगुजर,  अशोक पाटील,  राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

प्रतिभा शिंदे यांनी शासनाने केळीला फळाचा दर्जा द्यावा अशी मागणी करत भाव कमी दिला म्हणून कोणत्या व्यापाऱ्याला अटक होत नसल्याचे नमूद करून या विरोधात एल्गार पुकारण्यात येईल असा इशारा दिला. पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी ६० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

जळगाव  (ग्रामीण) तालुक्यासह जिल्हाभरात केळी उत्पादक यांचा माल हा बोर्ड भावापेक्षा कमी भावाने केळीची कापणी केली जात असल्याने व्यापाऱ्याच्या मनमानी व एकाधिकारशाही व्यापारी वर्गावर अंकुश नसलेल्या बाजार समितीच्या नाकर्तेपणा विरोधात शेतकरी हवालदिल झाला आहे.  व्यापारी हा नेहमी बोर्ड भावापेक्षा ५०० ते ६०० रूपयांनी कमी भाव देतो. यामुळे शेतकरी बांधवाला खुप मोठा आर्थिक फटका बसत आहे, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही शेतकरी बांधवांसह न्याय देण्यासाठी तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसत आहोत.दुष्काळामुळे शेतकरी अधिकच संकटात आहे, अशाही परिस्थितीत शेतकरी बांधव काळ्या मातीत कष्टाने केळी बाग जगवत आहे. त्यात निसर्गाची भर म्हणुन वादळी पावसाने केळीचा घात केला आहे. या सर्व प्रकारावर जळगांव बाजार समिती कुंभकर्णाची झोपेचे सोंग घेत आहे. त्यात भर म्हणुन अनेक खरेदीदारांकडे परवाने नाहीत (दलाल) यात फसवणुक शेतकऱ्यांची होत आहे, म्हणुन बाजार समित्या जे दर जाहीर करतात, त्याच दरात मात्र केळीची खरेदी केली जात नाही. झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ न बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधी कोरोनामुळे आता अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला आहे, मात्र केळीच्या हमी भावासाठी कुणीच पुढाकार घेत नाही, अशाप्रकारे शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष कराल तर येणाऱ्या काळात हाच शेतकरी शांत बसणार नाही,  असा इशारा प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांनी दिला आहे.

 

अशा आहेत प्रमुख मागण्या 

केळी बोर्ड भावानुसार व रास/फरक सहीत खरेदी करावे. केळी उत्पादक शेतकरी बांधवांची व्यापारी वर्गाकडुन होणारी पिळवणुक थांबवावी. केळी व्यापारी हा परवाना धारकच पाहिजे, तसेच बाजार समितीने त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक वृत्तपत्रा मध्ये प्रकाशित करावे.  अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहिर करावा व पंचनामे न करता सरसकट ५० हजार रूपये हेक्टरी अनुदान द्यावे.

 

 

 

Exit mobile version