Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जितीन प्रसाद यांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेसला झटका

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला झटका बसला युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्री राहिलेले नेते जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. 

दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.  २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत!

भाजपाचे उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी यांनी आज सकाळीच जितिन प्रसाद भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं ट्वीट केलं होतं.

जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेससाठी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांचा पेपर कठीण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशमधील एक प्रभावी नेते आहेत. विशेषत: काँग्रेससाठी ते उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण चेहरा असल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं व्होटबँकेचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.

जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये अध्यक्षपदापासून ते पक्षीय कार्यप्रणालीपर्यंत बदल करण्यात यावेत अशी मागणी पक्षातील एका गटाने केली होती. जी-२३ असं या गटाला म्हटलं गेलं. या गटाने आपल्या शिफारशीवजा मागण्यांचं पत्रच सोनिया गांधी यांना सादर केलं होतं. या गटामध्ये जितिन प्रसाद यांचा समावेश होता.

काही दिवसांपासून जितिन प्रसाद यांचे पक्षाशी संबंध काहीसे ताणले गेल्याचं बोललं जात आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जितिन प्रसाद यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला. त्या पराभवाची कारणमीमांसा करण्याचं काम देखील पक्षीय पातळीवर सुरू होतं. या पार्श्वभूमीवर जितिन प्रसाद यांचं भाजपामध्ये प्रवेश करणं आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचा मोठा फटका तर भाजपासाठी हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे!

 

Exit mobile version