Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जावेद अख्तर यांच्या सुरक्षेत वाढ

मुंबई प्रतिनिधी  तालीबानची संघ आणि अन्य हिंदुत्ववादी संघटनांशी तुलना केल्याने वादात सापडलेले ख्यातनाम शायर तथा गीतकार जावेद अख्तर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

 

जुहूमधील इस्कॉन मंदिराजवळ असणा-या अख्तर यांच्या घराबाहेरील पोलिस सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. या ठिकाणी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये महिला पोलिस कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. उजव्या विचारसरणीच्या जगभरातील संघटनांचे विचार हे सारखेच असतात असे मत अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलसारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य अख्तर यांनी केले होते.

 

आरएसएस, विश्व हिंदू परिषद हे तालिबानी मानसिकतेचे आहेत. त्यांचे समर्थन करणार्‍यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. जर संधी मिळाली तर ते सीमाही ओलांडतील, असे जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते. त्यावर भाजप नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत विधान मागे घेण्याची मागणी केली आहे. अख्तर यांनी माफी मागून ते विधान मागे न घेतल्यास त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे. अख्तर यांचे वक्तव्य चुकीचे आहे, इतकेच नव्हे हा हिंदू समाजाचा अपमान आहे. हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करीत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जाऊन तालिबानवर टीका करून दाखवावी, असे आव्हानही भातखळकर म्हणाले. जावेद अख्तर यांचे वक्तव्य निषेधार्ह असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

शिवसेनेनेही या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. मागच्या काळात ङ्गबीफफ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असे म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीची असल्याचे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे.

Exit mobile version