Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जामनेरात होणार स्पोर्टस हब ! पंतप्रधानांच्या आवाहनाला गिरीशभाऊंची टाळी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा तथा युवक कल्याण मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या पुढाकाराने जामनेरात भव्य स्पोर्टस हब मंजूर होणार असून या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी खेळांना प्राधान्य देण्याच्या ‘खेलो इंडिया, जितो इंडिया’ या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. यासोबत जळगावातील क्रीडा संकुलाचा देखील कायापालट होणार असून आज या संदर्भात उच्चस्तरीय समितीने प्रत्यक्ष पाहणी केल्यामुळे या कामांना वेग लागणार आहे.

ना. गिरीश महाजन यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये जळगाव शहराला लागून असणार्‍या मोठ्या जागेवर भव्य मेडिकल हबला मान्यता मिळवून दिली असून मध्यंतरी अडीच वर्षात हे काम रखडले होते. मात्र त्यांच्याच पुढाकाराने जळगावात कार्यान्वित झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कोविडच्या आपत्तीत अतिशय महत्वाची कामगिरी पार पाडली होती. आता पुन्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री झाल्यानंतर गिरीशभाऊंनी मेडिकल हबच्या कामाला वेग दिला आहे. अशा प्रकारच्या सर्व वैद्यकीय शिक्षणांची उपलब्धता असणारे हे देशातील पहिले मेडिकल हब असणार आहे. याच पध्दतीत सर्व खेळांचे स्पोर्टस हब असावे असा ध्यास गिरीशभाऊंनी घेतला होता. कारण एक तर ते स्वत: उत्तम क्रीडापटू आहेत. यातच पंतप्रधानांनी क्रीडाला प्राधान्य देण्याचे धोरण आखले आहे. यासाठी खेलो इंडिया जितो इंडिया ही मोहिम आखण्यात आली आहे. याहून मोठा योग म्हणजे ना. महाजन यांच्याकडे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आल्यामुळे त्यांनी स्पोर्टस हबच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला आहे.

या अनुषंगाने आज उच्चस्तरीय समितीने जामनेर आणि जळगाव येथे भेट दिली आहे. यात जामनेर येथे अतिशय अद्ययावत असे स्पोर्टस हब होणार असून यासाठी सुमारे पाच कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यासोबत जळगाव येथील क्रीडा संकुलाचा कायापालट करण्यासाठी देखील स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे.

ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला बुस्टर डोस मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यावेळी राणी द्विवेदी निघोट क्रीडा अधिकारी दीक्षित जामनेर तहसीलदार शेवाळे  मुख्याधिकारी भोसले जे.के.चव्हाण जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Exit mobile version