Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यासाठी २५ लाख ५० हजार कापूस बियाणे पाकीटाची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ अंतर्गत कापूस बियाण्याच्या संभाव्य ५ लाख ७० हजार हेक्टर क्षेत्रासाठी २५ लाख ५० हजार पाकिटांची मागणी कृषि आयुक्तालयास नोंदविण्यात आली आहे. अशी माहिती वैभव शिंदे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

शासनाच्या २३ मार्च २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे बिटी बियाण्याच्या किंमती ठरविण्यात आल्या असून बीटी संकरीत कापसाच्या बीजी-१ वाणाची किंमत- रुपये ६३५/- तर बीजी-२ वाणाची किंमत रुपये ८५३ इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुरेश्या प्रमाणात सर्वच कंपन्यामार्फत कापसाचे बियाणे उपलब्ध होणार असुन त्याप्रमाणे उपलब्धतेचे नियोजन केले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बियाण्याच्या बॅगवर निर्धारीत दरापेक्षा जास्त दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनात आल्यास संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे त्वरीत तक्रार करावी. बियाणे खरेदी पक्क्या बिलाने व अधिकृत दुकानातुनच करावी. कृषि निविष्ठा विक्रेते यांनी कृत्रीम बियाणे टंचाई निर्माण करुन जादा दराने विक्री करु नये याकरीता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांमार्फत तपासणी सुरु असल्याचेही श्री. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version