Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले 90 टक्क्यांवर- जिल्हाधिकारी राऊत

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात त्वरीत शोध, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचार या त्रिसुत्रीचा अवलंब केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९०टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान जिल्ह्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणासोबतच आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या व आंगणवाडी सेविकांचेही कौतूक केले आहे.

जिल्ह्यात आज (7 ऑक्टोबर) रोजी 505 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 45 हजार 310 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.22 टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 701 ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी 1 हजार 679 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 2 हजार 686 रुगण हे लक्षणे नसलेले असून अवघे 1 हजार 15 रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये 1 हजार 7 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 538, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 477 रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात 328 रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने गेल्या वीस दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 410 ने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्र्यांच्या आवाहनाला लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, संघटना, सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, दानशूर व्यक्ती यांनी उत्सफुर्तेपणे प्रतिसाद दिल्याने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात 12 हजार 854 बेड असून त्यापैकी 2 हजार 19 ऑक्सिजनयुक्त बेड असून 322 आयसीयु बेडचा समावेश आहे.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या तपासणीत लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 96 हजार 724 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 1 लाख 20 हजार 508 अशा एकूण 2 लाख 17 हजार 232 संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 1 लाख 65 हजार 353 चाचण्या निगेटिव्ह तर 50 हजार 222 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून इतर अहवालांची संख्या 1 हजार 123 असून 534 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 1 हजार 211 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा 2.41 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.

Exit mobile version