Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट

 

जळगाव : प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट पडली आहे. जळगावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आता परंपरागत शत्रू असलेल्या भाजपसह आपल्या मित्रपक्षांविरुद्ध मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांसाठीची निवडणूक मानली जाते. ‘कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गाव पातळीवर बैठका घेतल्या. त्यात कार्यकर्त्यांनी संमिश्र मते मांडली’ असं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी स्पष्ट केलं.

‘धर्मनिरपेक्ष मताच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसची ताकद कमी आहे, अशा ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायला हरकत नाही. तसेच ज्या ठिकाणी आपली ताकद आहे, त्या ठिकाणी मात्र स्वबळावरच लढायला हवे, असा आग्रह धरला. या माध्यमातून कार्यकर्त्यांना न्याय देता येऊ शकतो, असाही कार्यकर्त्यांचा सूर होता. कार्यकर्त्यांच्या मताचा विचार करुन, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काँग्रेसची ताकद स्वबळावर लढण्यावर आमचे एकमत झाले आहे.’ अशी माहिती उल्हास पाटील यांनी दिली.

 

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे. कोरोना काळात ग्रामीण पातळीवर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने राजकीय पक्षांमध्येही उत्साह वाढला आहे. राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी जळगाव जिल्ह्यात मात्र काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच नेते भाई जगताप यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ‘एकला चलो रे’ची हाक दिली होती. त्यानंतर राज्याच्या विविध भागातही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून स्वबळाची चाचपणी होताना दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. काँग्रेसच्या पवित्र्यामुळे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Exit mobile version