Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यात पहिल्या दिवशी ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील ४४३ अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

आज सकाळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, डॉ. जयकर यांच्यासह आयएमए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, अधिपरिचारीका, कर्मचारी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोनाच्या लसीकरणासाठी आज पहिल्या दिवशी सात केंद्रावर प्रत्येकी १०० याप्रमाणे जिल्ह्यातील ७०० आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ५९, महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटलमध्ये ८३, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा ६७, जामनेर ५१ , तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा ६९ , चाळीसगाव ४८ , आणि न. पा. भुसावळ येथील केंद्रावर ४६ असे एकूण ४४३ आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. पैकी जामनेर येथे एका आरोग्य सेवकांला लसीकरणानंतर सौम्य लक्षणे जाणवल्यानंतर त्यांना केंद्रातील निगराणी कक्षात ठेवण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाची लस देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, आयएमए चे डॉक्टरांसह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने परिश्रम घेऊन ही लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे पार पाडली.

Exit mobile version