Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यातही मद्याची ऑनलाईन विक्री; देशीला मात्र वगळले !

जळगाव प्रतिनिधी । आता जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधीत असणारे क्षेत्र वगळता अन्य भागांमध्ये मद्याची ऑनलाईन विक्री सुरू होणार असून आज जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तर यात देशी दारूला मात्र वगळण्यात आले आहे.

राज्य सरकारने अलीकडेच अटी-शर्तींच्या अधीन राहून ऑनलाईन मद्य विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील काही भागांमध्ये या स्वरूपातील सेवा सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातही ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीत असणारे जळगाव, भुसावळ, अमळनेर, भडगाव, चोपडा आदी शहरी हद्दींसह अडावद येथील अपवाद वगळता जिल्ह्यातील मद्य विक्रेते आता ऑनलाईन मद्य विक्री करू शकणार आहेत.

जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशानुसार विदेशी मद्य, सौम्य मद्य, वाईन आणि बीयर आदींची ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरपोच विक्री करता येणार आहे. तथापि, यातून देशी दारूला मात्र वगळण्यात आले आहे. ज्यांच्याकडे मद्याचा परवाना आहे त्यांनाच या प्रकारातील सेवा पुरविण्यात यावी असे निर्देश यात देण्यात आलेले आहेत. मद्यासाठीचा परवाना महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तर दुकानदार हा दूरध्वनी, भ्रमणध्वनी, व्हाटसअ‍ॅप, एसएमएस आदींच्या माध्यमातून ऑर्डर स्वीकारू शकणार आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असून जिल्हाधिकार्‍यांनी विहीत केलेल्या वेळेतच ग्राहकांना त्यांची ऑर्डर घरपोच पोहचवता येणार आहे. तर डिलीव्हर बॉयने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देखील यात देण्यात आलेले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ग्राहकाला संबंधीत मद्याच्या छापील मूल्यात म्हणजेच एमआरपीमध्येच विक्री करावी लागणार असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version