Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन स्थानकासमोर सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने सीएसआर निधीतून स्वच्छतागृह उभारण्याची तयारी दर्शविली आहे. आज महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

 

सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने काही दिवसांपूर्वीच सागरपार्कवरील सुशोभीकरणाचे काम त्यांच्या सीएसआर निधीतून केले आहे. यानंतर या कंपनीने नवीन बस स्थानकासमोर स्वच्छतागृह बांधावे असे महापालिका प्रशासनाने सूचित केले होते. या अनुषंगाने कंपनीने संबंधीत कामाची तयारी दर्शविली असून आज या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

महापौर जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, माजी महापौर नितीन लढ्ढा, शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी स्थायी समिती सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, नगसेवक अनंत जोशी, नगरसेवक सचिन पाटील, सुप्रीमचे  सिनीअर जनरल मॅनेजर प्रभुदेसाई आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. महापौर व उपमहापौरांनी कुदळ मारून या कामाचे भूमीपुजन केले.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी या स्वच्छतागृहाच्या माध्यमातून स्त्री-पुरूषांची सोय होणार असल्याचे सांगितले. गेल्या अनेक महिन्यापासून स्वच्छतागृहाची करण्यात येणारी मागणी यातून पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या मनोगतातून सुप्रीम कंपनीचे आभार मानले. ते म्हणाले की, सागरपार्क मैदानाच्या सुशोभीकरणाच्या कामाप्रसंगीच आम्ही स्वच्छतागृहाबाबत कंपनीच्या अधिकार्‍यांना केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. नवीन बस स्थानकाचा परिसर हा मध्यवर्ती भागात असून येथे अद्ययावत प्रसाधानगृह उभारण्यात येत असून याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

दरम्यान, या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच असणार्‍या रिक्षा स्टॉपवरील रिक्षा चालकांनीही या कामास प्रारंभ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या सदस्यांनी या स्वच्छतागृहाच्या कामाच्या भूमिपुजनाला आपल्यालाही आमंत्रीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानले.

दरम्यान, आजपासून या स्वच्छतागृहाच्या कामास प्रारंभ होत असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रीम इंडस्ट्रीजच्या अधिकार्‍यांनी याप्रसंगी दिली.

 

 

 

Exit mobile version