Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात सोनेदरात दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण

 

जळगाव : प्रतिनिधी । कोरोना काळात 58 हजार रुपयांच्या घरात गेलेले सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. जळगावमध्ये सोन्याचे दर  दीड हजार रुपयांपेक्षा अधिकने कमी झालेत.

 

सध्या जळगावमध्ये सोन्याचे दर 46 हजार 700 रुपये प्रतितोळापर्यंत खाली आले आहेत. जळगाव सराफ बाजारात शनिवारी सोन्याचे दर जीएसटी शिवाय 46 हजार 700 रुपये, तर 3 टक्के जीएसटीसह विक्रीचे दर 48 हजार 100 प्रतितोळा असे नोंदवण्यात आले

 

सध्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात तब्बल दीड हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण नोंदवली गेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर भडकले आहेत.सुरक्षित परतावा मिळावा म्हणून गुंतवणूकदारांकडून सोन्याऐवजी अन्य पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सोन्याची मागणी घटली आहे.

 

 

स्थानिक बाजारातही सोन्याला फारसा उठाव नाही. या प्रमुख कारणांमुळे सोन्याचे दर घसरत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर अस्थिर व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर देखील होत आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात सोन्याचे दर तब्बल दीड हजारांपेक्षा अधिक कमी झाले आहेत.

 

लग्नसराई जवळपास आटोपली आहे. त्यामुळे सोन्याला मागणी नाही. याच कारणामुळे सोन्याचे दर कमी होत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्यांची लग्ने आहेत, असे लोक सध्या सोने घेत आहेत, अशी माहिती सोने व्यापारी पप्पूशेठ बाफना यांनी दिली.

 

 

सोन्याशिवाय चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. चांदीच्या दरात 173 रुपयांची वाढ होऊन 67,658 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली.

 

दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे दर 861 रुपयांनी कमी होऊन 46,863 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत.

Exit mobile version