Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात लेखा व कोषागारे विभागाच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

Kridasparda

जळगाव, प्रतिनिधी । संचालनालय लेखा व कोषागारे कर्मचारी कल्याण समिती यांच्यावतीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटक गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते होवून मुख्य लेखा व वित्त अधिकारी (संचालक संवर्ग) तापी पाटबंधारे विकास महामंडळ,जळगाव बाळासाहेब घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धांना शानदार शुभारंभ झाला. दोन दिवसीय या क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण 36 क्रीडा प्रकारांचा समावेश असून नाशिक विभागातील एकूण 350 खेळाडूंनी स्पर्धेत भाग नोंदविलेला आहे. 36 क्रीडा प्रकारात प्रामुख्याने क्रिकेट, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, खो-खो, स्विमिंग (पोहणे) महिलांसाठीच्या थ्रोबॉल यांसह इतर खेळांचा समावेश आहे.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, आदिवासी विकास महामंडळ नाशिकचे महाव्यवस्थापक उत्तम कावडे, वरिष्ठ कोषागार अधिकारी, नाशिक विलास गांगुर्डे, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव मिलींद दीक्षीत, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे जळगाव मुख्य शाखेचे मुख्य व्यवस्थापक अशोक सोनोने, महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागारे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बालाजी परदेशी, संघटनेचे विभागीय अध्यक्ष योगेश सोनवणे, राजपत्रित संधटनचे विभागीय अध्यक्ष रमेश शिसव, सरचिटणीस राजेश राजवाडे, सचिव लक्ष्मण नेवाडकर, सहसचिव अन्नासाहेब भडांगे, हे प्रमुख पाहुणे म्हणून तर आयोजक म्हणून सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक. निलेश राजुरकर, सहसंचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, नाशिक विभाग, नाशिक गिरीष देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, विनोद गायकवाड, महानगर पालिकेचे मुख्य लेखापरिक्षक संतोष वाहुळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत, सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखा परीक्षा, जळगाव विनोद चावरे हे आहेत.

खिलाडी वृत्तीतून खेळाडूंनी खेळ खेळावेत – डॉ.उल्हास पाटील
उद्घाटनपर भाषणात डॉ.उल्हास पाटील यांनी दोन दिवसीय नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांना शुभेच्छा देवून खेळाडूंनी खेळ हे खिलाडू वृत्तीतून खेळावेत असे सांगून खेळामुळे आपल्या आरोग्य संपतीत वाढ होवून चांगल्या आरोग्यासह दिर्घायुष्य मिळते. खेळातून मानवाला जगण्याची नवी उम्मीद मिळत असते. शिवाय खेळामुळे मानव प्रांत,वर्ण,लिंग,जात-धर्म,गरीब-श्रीमंत अशा प्रकारे भेदभावाला अजिबात थरा देत नाही. खेळांमुळे समाजात सलोखा व एकमेकांविषयी आदर निर्माण होतो. जसे की,खेळात समोरच्या संघातील खेळाडू हा केवळ प्रतिस्पर्धी आहे दुश्मन नाही अशी शिकवणही खेळातून आपल्याला मिळत असते. असेही डॉ. पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सर्व उपस्थित खेळाडूंना संबांधतांना प्रतिपादन केले. विभागीय क्रीडा स्पर्धा उदघाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलतांना बाळासाहेब घोरपडे यांनी प्रथम नाशिक विभागातील अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार आणि जळगावच्या सर्व खेळाडूंना शुभेच्दा दिल्यात. खेळ खेळतांना कोणत्याही द्वेशवृतीला थारा देवू नका, आपण एकाच कुटुंबातील आहोत याची जाणीव ठेवा, पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो त्यांच्या निर्णयाचा आदर करा जिंकलेल्यांचे अभिनंदन करताना हरलेल्यांचे कौतुक करण्याची खिलाडू वृत्ती दाखवण्याचे औदार्य दाखवा असा सल्ला व सूचन देतांनाच संचालनालयाने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचे भूतकाळातील योगदान लक्षात घेता आपण असे खेळ खेळा की ज्याचा भविष्यात आवर्जुन उल्लेख करणे क्रमप्राप्त असेल.

प्रास्ताविकात गायकवाड यांनी केले. निलेश राजुरकर आणि गिरीष देशमुख यांचेही शुभेच्छापर भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिव्यांग पुनर्वसन अधिकारी घन:श्याम महाजन व रतनकुमार थोरात यांनी तर आभार प्रदर्शन कपिल पाटील यांनी मानले.

Exit mobile version