जळगावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात !

जळगाव प्रतिनिधी । शहर कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी मनपा प्रशासनाकडून जळगावात मोहिमेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. महापौरांनी स्वतः कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बोलावून त्यांची तपासणी करून घेतली.

जळगावात कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दोन दिवसापूर्वी महापौर भारती सोनवणे यांनी बैठक घेतली होती. शहरात १५१ पथकाकडून तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. बुधवारी सकाळी मनपाच्या पथकाकडून प्रत्यक्षात तपासणी मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलावून तपासणी करून घेतली. प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची तपासणी करावी, कुणीही आजारी असल्यास त्यांची माहिती घेऊन शासन निर्देशानुसार टेस्ट करण्यास घेऊन जावे. कोणत्याही व्यक्तीची माहिती अंदाजे भरू नये अशा सूचना महापौरांनी केल्या.

नागरिकांनी सहकार्य करावे : महापौर
जळगावात माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाला भेट देण्यासाठी मनपाचे पथक येणार असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तपासणी करून घ्यावी. जर कुणाचे कुटुंब मोहिमेत राहून गेल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content