Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात प्रथमच महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप-२०२२ आयोजन (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश संघटनेद्वारे  महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप २०२२ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती के. सी. ई. सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप-२०२२ स्पर्धा ८ ते ११ मे २०२२ या कालावधीत एकलव्य क्रीडा संकुलचे स्क्वॅश कोर्ट, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर या ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २० ते २५ जिल्ह्याचा सहभाग या स्पर्धेत अपेक्षीत असून प्रत्येक जिल्हा आणि वयोगटातुन जास्तीत जास्त २० ते २५ खेळाडू सहभागी होतील. जळगाव जिल्ह्यातून ६० खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेकरिता एकूण १२ पंच अधिकारी व ४ ते ५ संघटना पदाधिकारी असतील. सदर स्पर्धा या जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.

स्पर्धा वयोगट: अ गट : सब ज्युनियर ११ /१३/१५/१७ वर्षा आतील मुले व मुली (स्पर्धा दिनांक ८ व ९ मे २०२२).
ब गट : ज्युनियर व सिनियर: १९ वर्षा आतील मुले मुली व खुला गट(महिला व पुरुष) स्पर्धा ९ ते ११ मे २०२२ या कालावधीत होतील.

मुलींची निवास व्यवस्था महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह तर मुलांची निवासव्यवस्था ए.टी. झांबरे विद्यालय येथे करण्यात आली आहे.

के.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांच्या दूरदृष्टीतुन खान्देशात प्रथमच व एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एकूण ५ स्क्वॅश कोर्टचे उदघाटन व केसीईच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने नंदकुमार बेंडाळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या ५ वर्षात ऑलिंम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, ५ वूडन बॅडमिटन कोर्टस आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १० मी. शूटिंग रेंज़नंतर आता भव्य व अद्ययावत अशा ५ स्क्वॅश कोर्टसची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात स्क्वॅश खेळाडू तयार होतील त्याकरिता प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यावेळी पत्रकार परिषदेला प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर, प्राचार्य संजय भारंबे, प्राचार्य अशोक राणे तसेच जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

 

Exit mobile version