जळगावात पोलिसांप्रती व्यक्त होतेय संवेदना

 

 

जळगाव, प्रतिनिधी  ।  ‘लॉकडाउन’ व संचारबंदीच्या काळात बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांचे दंडुके बसत असल्याच्या तक्रारी येत असल्या तरी दुसरीकडे सर्व जनता घरात बसली असताना स्वतःचे आरोग्यपणाला लावून रस्त्यांवर फिरणाऱ्या पोलिसांप्रती संवेदनेसह कृतज्ञता जनतेतून व्यक्त होत आहे.

पोलिसांना कोणी सॅनिटायझर देते तर कोणी मास्क…कोणी त्यांना अन्न पाकिटे पोहोचवते तर, प्रत्यक्ष भेटून व दोन्ही हात जोडून पोलिस नागरिकांच्या आरोग्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतात. जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व त्यांच्या मित्रांनी रविवारी सायंकाळी पोलिस बांधवांना जेवण व पाण्याच्या बाटल्या वाटप केल्या. अतिशय गरिबीची परिस्थिती असतानाही त्यांनी पोलिसांना मदत केल्यानं त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

‘लॉकडाउन’ व संचारबंदीत घराबाहेर पडण्यास बंदी असतानाही अनेक जण भाजी, किराणा, औषधे वा अन्य काही कारणाने वाहने घेऊन घराबाहेर पडतात. यापैकी काहींची कारणे खरी असतात तर काही जण टाइमपास म्हणून बाहेर पडलेले असतात. अशांना काठ्यांचा प्रसाद पोलिसांकडून दिला जात असल्याने त्यांच्याकडून पोलिसांविषयी नाराजी व्यक्त होते. पण आपल्याच आरोग्य रक्षणासाठी पोलिस आपल्याला घरातच थांबण्याचा देत असलेला सल्ला मोलाचा असल्याची जाणीव तक्रारदारांना होत नाही. अशा स्थितीत दुसरीकडे मात्र अनेक स्वयंसेवी संस्था वा व्यक्ती पोलिसांना आवश्यक मदत करण्यास पुढाकार घेत आहेत. या काळात पोलिस बांथवांना जेवण व पाण्याच्या बाटल्या सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व त्यांच्या मित्रांनी रविवारी सायंकाळी वाटप केले. शहरातील चौकाचौकात कार्यरत असलेले पोलीस सहकारी बांधव यांना जेवण आणि पाण्याच्या बाटल्या पुरवतांना मनोज ठाकरे व त्यांचे मित्रमंडळी रमेश चंदन राहुल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी सर्वांचे आभार मानले.

 

Protected Content