Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील संजीवन हार्ट हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी अधिग्रहीत

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा म्हणून कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून शहरातील संजीवन हार्ट हॉस्पीटल अत्यावश्यक बाब म्हणून अधिग्रहीत केले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. हॉस्पीटलमध्ये कोरोनाबाधित रुग्‍णांकरीता कोव्‍हीड 19 केअर सेंटर कार्यान्‍वीत करण्‍यात आलेले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 14 मार्च, 2020 च्या पत्रानुसार कोरोना विषाणु (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्दी केली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणुमूळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केलेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात देखील गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवयक आहे.

संजीवन हार्ट हॉस्पीटल, जळगाव मध्ये कोव्हिड 19 विषाणूमुळे बाधीत झालेल्या व्यक्ती / रुग्णच दाखल करण्यात येतील, या व्यतीरीक्त अन्य कोणत्याही रुग्णास हॉस्पीटल मध्ये दाखल करुन घेता येणार नाही. संजीवन हार्ट हॉस्पीटल, जळगाव यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमीत करण्यात येणा-या सूचना निर्देश, आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. असेही जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version