Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातल्या शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकानेही उघडणार; राष्ट्रवादीचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी । शहरातल्या विविध व्यापारी संकुलांमधील दुकाने खुलण्याचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’च्या माध्यमातून हळूहळू सर्व व्यवहार व बाजारपेठ खुली करण्यास प्रारंभ केला आहे. याच्या अंतर्गत आजवर व्यापारी संकुले म्हणजेच शॉपींग कॉम्प्लेक्समधील दुकानांना खोलण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. गेल्या साडे तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने संकुलांमधील व्यापार्‍यांना मोठी हानी सहन करावी लागली होती. या संदर्भात राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी ३ जुलै रोजी व्यापार्‍यांसह महापालिका आयुक्तांची भेट घेऊन नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली होती. याबाबत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्यांनी हा प्रश्‍न सोडविण्याचे साकडे घातले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या या पाठपुराव्याचे फलीत म्हणून राज्याच्या महसूल, वन आणि मदत व पुनर्वसन खात्याने परिपत्रक काढून राज्यातील मुंबई, पुणे व अन्य महापालिकांसोबत जळगाव महापालिकेच्या हद्दीत असणार्‍या दुकानांबाबत नवीन नियम जाहीर केले आहेत. यात मिशन बिगीनच्या अंतर्गत दुकानांना सकाळी ९ ते ५ ऐवजी सकाळी ९ ते ७ या कालावधीत उघडे राहण्यासाठी परवानगी दिली आहे. यासोबत सातही दिवस दुकाने उघडी राहणार आहेत. तर व्यापारी संकुलांमध्ये देखील ऑड-इव्हन हा फॉर्म्युला लागू करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. सध्या जळगावात १३ जुलै पर्यंत सक्तीचा लॉकडाऊन सुरू असल्यामुळे राज्य शासनाचा हा निर्णय लागू होणार नाही. तथापि, १४ जुलै पासून मात्र व्यापारी संकुलांमधील दुकाने सुरू होणार आहेत.

या संदर्भात राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे व्यापारी संकुले वगळता अन्य ठिकाणच्या दुकानदारांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळाला होता. मात्र कॉम्प्लेक्समधील व्यापार्‍यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही अजितदादा पवार आणि प्राजक्त तनपुरे यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला असून याचेच फलीत म्हणून हा निर्णय झालेला आहे. आता याच्या अंमलबजावणीचे व विशेष करून व्यापारी संकुलासाठी ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाला पार पाडावी लागणार आहे. जळगावच्या व्यापार्‍यांना ना. अजितदादा आणि ना. प्राजक्त तनपुरे यांनी दिलासा दिला असल्याचे अभिषेक पाटील यांनी नमूद केले.

Exit mobile version