Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जलसंवर्धनासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा– जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र शासनाने जलसंवर्धनासाठी जलशक्ती अभियान सुरू केले आहे. पावसाचे पाणी वाचविणे काळाची गरज असून त्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात तरुणांनी पुढाकार घेतल्यास ते लवकर शक्य होते. जलशक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

जलशक्ती अभियानाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू युवा केंद्र जळगाव व योगी संस्थेतर्फे वेबिनार आयोजित करण्यात आला होता. वेबिनारमध्ये १०० वर जलप्रेमींनी सहभाग नोंदविला. वेबिनारमध्ये नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर, नरेंद्र चुग,  ज्ञानेश शिवाजीराव मगर आणि योगी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. जागतिक स्तरावर जलसंवर्धनासाठी कोणते पाऊल उचलले जाते, कशाप्रकारे मोहीम हाती घेण्यात येते, काय-काय उपाययोजना केल्या जातात याबाबत वेबिनारमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच जलसंवर्धनासोबत वृक्ष संवर्धन देखील आवश्यक आहे. पाण्याचे नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवण्यासाठी घनदाट जंगल देखील आवश्यक आहे. पावसाचे पाणी वाचवून ते साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग, नैसर्गिक तलाव, लहान मोठे बंधारे उभारण्याबाबत जनजागृती करावी असे वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

Exit mobile version