Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जय नगरातील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरातील जय नगर येथील एका बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लोखंडी तिजोरी, रोकड व कपडे असा एकूण १९ हजार २०० रूपयांचा ऐवज लांबविल्याची घटना शुक्रवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. लाल या प्रकरणी चोरट्याविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय नगर येथे यमुना एकनाथ चौधरी यांच्या मालकीचे घर आहे. सद्या त्या अमेरिका येथे वास्तव्यास असल्यामुळे जय नगरातील घर बंद अवस्थेत आहे. या घराच्या मेंटनन्सचे काम ईश्वर महाजन यांच्याकडे असून ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्यांना यमुना चौधरी यांची मुलगी जयश्री यांचा फोन आला. त्यांनी घराच्या आवारातील सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगितले. महाजन यांनी चौधरी यांच्या घरी जाऊन लागलीच सीसीटीव्ही कॅमे-याची वायर जोडून कॅमेरे सुरू केले.

दरम्यान, सोमवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी जयश्री चौधरी यांनी ईश्वर महाजन यांना फोन करून आईच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा बंद पडले असल्याचे सांगितले. शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता महाजन हे यमुना चौधरी यांच्या घरी आल्यावर त्यांना मुख्य दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसून आला. घरात प्रवेश केल्यावर सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. एवढेच नव्हे तर ५ हजार रूपये किंमतीची लोखंडी तिजोरी, १० हजार रूपयांची रोकड, ३ हजार रूपय किंमतीचे कपडे व डीव्हीआर चोरीला गेल्याचे दिसून आले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पण, चोरट्यांचा सुगावा लागेल, असे काहीही पोलिसांना मिळून आले नाही. अखेर ईश्वर महाजन यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुशिल चौधरी करित आहेत.

Exit mobile version