Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जयंत पाटील यांनी सांगितलं पवार — मोदी भेटीचं कारण

 

मुंबई : वृत्तसंस्था । जयंत पाटील यांनी  आजच्या पवार — मोदी  भेटीमागे सहकार क्षेत्रातील परिस्थिती हे मुख्य कारण असल्याचं सांगितलं.

 

“देशाच्या वेगवेगळ्या भागातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रातल्या लोकांनी गेल्या महिन्या-दीड महिन्यात अनेक पत्र पाठवली. त्या सगळ्यांचा विचार करून केंद्र सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे आणि रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार त्यांना भेटायला गेले”, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पंतप्रधान कार्यालयात भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. जवळपास तासभर या दोन शीर्षस्थ नेत्यांची भेट झाली. या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? या मुद्द्यावर वेगवेगळे राजकीय तर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातील राजकारण, शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या चर्चा, स्वतंत्र सहकार खातं आणि राज्यातील सहकार क्षेत्र, राज्यातील विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे लागलेला केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा अशा अनेक मुद्द्यांचे अंदाज बांधले जात होते. मात्र, शरद पवारांनी नेमकी कशासाठी पंतप्रधानांची भेट घेतील होती, याविषयी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कारण स्पष्ट केलं आहे.

 

दरम्यान, यावेळी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषायांव देखील चर्चा झाली असण्याची शक्यता जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. “संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि ए. के. अँटनी यांच्यासोबत काल चर्चा केली होती. त्यामुळे शरद पवारांनी देशाच्या सुरक्षेशी संबंधित विषयांवर देखील मोदींशी चर्चा केली असेल. नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचा तपशील माझ्याकडे नाही. पण मला शरद पवारांनी सांगितलं होतं की या सगळ्या विषयांवर मी पंतप्रधानांची भेटीसाठी वेळ मागितली आहे आणि मी त्यांची भेट घेणार आहे”, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

 

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

 

Exit mobile version