Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जबाबदारीपासून पळू नका- पंतप्रधानांनी ‘त्या’ खासदारांना सुनावले !

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या खासदारांवर पंतप्रधान मोदी चांगलेच भडकले असून तुम्ही जबाबदारीपासून पळू नका अशी तंबी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं आहे. तर भारतातील रुग्णांची संख्या १४०पर्यंत पोहोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर काही खासदारांनी कामकाज स्थगित करण्याची मागणी केली होती, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत संबंधितांना कानपिचक्या दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर संसदेचं कामकाज थांबवण्याची मागणी करणार्‍या खासदारांना खडे बोल सुनावले आहेत. खासदारांनी आपल्या जबाबदारीतून पळ काढू नये, अनेक जण मोठा धोका असतानाही कर्तव्य बजावत आहेत. मी जे ऐकतो आहे, ते योग्य नाही. खासदारांनी या महारोगराईशी लढण्यासाठी पुढे यायला हवं. भारतीय हवाई दल आणि एअर इंडियाच्या क्रू मेंबर्सचा आपण विचार केला पाहिजे. जे लोक कोरोनाप्रभावित देशांतून भारतीयांना मायदेशात परत आणत आहेत. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि नर्सेसचाही विचार करायला हवा. तळागाळातीलही लोकांचाही विचार व्हायला हवा. अशा वेळी जर कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्यास काय होईल?, असा प्रश्‍न मोदींनी उपस्थित खासदारांना विचारला आहे.

दरम्यान, संसदेचं अधिवेशन हे ठरलेल्या तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे. पंतप्रधानांनी या बैठकीत मीडियाचीही भूमिकाही स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांमधून कोविड-१९च्या संबंधी लोकांना योग्यपद्धतीनं जागरूक करण्यात येत असल्याने मीडियाचे कौतुक केले आहे. तसेच प्रत्येक खासदारांना आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे.

Exit mobile version