Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनतेच्या मुलभूत प्रश्नांवर केंद्र सरकार ‘फेल’ – नाना पटोले

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | २०१४ पासूनच देशात आणीबाणी सुरू असून विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी व विरोधी पक्ष फोडण्यासाठी भाजपा ईडी, सीबीआय, आयकर सारख्या यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे पुन्हा-पुन्हा स्पष्ट होत आहे, असा थेट हल्लाबोल महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा फोडा व राज्य करा या इंग्रजांच्या नितीप्रमाणे राजकारण करत असून जे नेते वा राजकीय पक्ष भाजपाला साथ देत नाहीत त्यांच्या घरांवर सीबीआय, ईडीची कारवाई केली जात आहे. देशातील विरोधक संपवण्याचे काम भाजपा करत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मनीष सिसोदिया, तसेच राष्ट्रीय जनता दलाच्या आमदाराच्या घरावर सीबीआयने टाकलेले छापे हेच दाखवतात. सीबीआय, ईडी, आयकर या यंत्रणांचा राजकीय इप्सित साधण्यासाठी भाजपा गैरवापर करत आहे. बिहारची सत्ता गेल्याने भाजपा बिथरली आहे. भाजपाची साथ देणाऱ्यावर कारवाई होत नाही. देशात इंग्रजांपेक्षाही क्रूर पद्धतीने भाजपा काम करत आहे.

जनतेल्या दिलेल्या आश्वासनाला भाजपाला विसर पडला आहे. महागाई कमी करू, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, परदेशातून काळा पैसा परत आणू अशी वारेमाप आश्वासने देऊन भाजपा केंद्रात सत्तेवर आला पण सत्तेत आल्यापासून हे सरकार फक्त मुठभर उद्योगपतींसाठीच काम करत आहे, जनतेसाठी नाही. देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न आहेत पण ते सोडवण्यात केंद्र सरकार फेल झाली आहे म्हणून धार्मिक मुद्दे उकरून काढले जात आहेत. जनता भाजपाला कंटाळली असून आगामी निवडणुकीत लोक भाजपाला घरचा रस्ता दाखवतील.

Exit mobile version