Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनजागृतीसाठी लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो ; सरकारचा खुलासा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना  नियम लसीकरणानंतरही पाळावेत हे लोकहिताच्या दृष्टीने महत्वाचं आहे, हाच संदेश देण्यासाठी मोदींचा फोटो या प्रमाणपत्रावर छापण्यात आलाय, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

 

लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा मागील काही काळापासून चर्चेत आहे. अनेकदा विरोधकांकडून या लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची काय गरज आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. मात्र आता केंद्र सरकारने यासंदर्भातील स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचं सरकारने म्हटलं आहे.

 

काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि पत्रकार कुमार केतकर यांनी संसदेमध्ये लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर छापण्यात येणाऱ्या मोदींच्या फोटोसंदर्भात प्रश्न विचारला. लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापणं हे गरजेचं आणि अनिवार्य आहे का असा प्रश्न केतकर यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उत्तर दिलं.  साथ आणि त्याचा होणारा प्रादुर्भाव पाहता नियमांचं पालन करणं हे प्रादुर्भाव रोखण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्यासोबतच्या संदेशामधून नियमांचे पालन करण्यासंदर्भातील जागृती केली जात आहे. हे सर्व व्यापक लोकहिताच्या दृष्टीने केलं जात असल्याचंही भारती पवार यांनी सांगितलं.

 

अशाप्रकारचे महत्वाचे संदेश लोकांपर्यंत जास्तीत जास्त परिणामकारक पद्धतीने पोहचावेत ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, असंही भारती पवार म्हणाल्या. कोविनच्या माध्यमातून देण्यात येणारी लसीकरण प्रमाणपत्रं ही जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार असून त्यांच्या माध्यमातून लस घेतल्याची माहिती तपासून पाहता येते, असंही आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या.

 

यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने अशाप्रकारे पंतप्रधानांचा फोटो एखाद्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर छापणं बंधनकारक केलं होतं का असा प्रश्न विचारला. पोलिओ किंवा कांजण्यांच्या लसीकरणासंदर्भात यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने असा फोटो छापणं अनिवार्य केलेलं का अशी विचारणा केतकर यांनी केली. मात्र सरकारने या प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही.

 

लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो छापण्यावरुन विरोधकांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. अनेक राज्यांनी तर पंतप्रधानांच्या फोटोऐवजी मुख्यमंत्र्यांचा फोटो असणारी प्रमाणपत्र जारी केली आहेत.

 

 

Exit mobile version