Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जगाला कुशल, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांबरोबर मूल्यनिष्ठ नागरीकांचीही आवश्यकता – प्र-कुलगुरू प्रा. इंगळे

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अभियांत्रीकी, औषधनिर्माण, वाणिज्य, व्यवस्थान, विधी व न्याय आणि इतर विद्याशाखांच्या शिक्षणाबरोबर मूल्यशिक्षणाचीही तितकीच आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, यांनी ब्रह्माकुमारी विश्व विद्यालयात केले.

 

प्रजपिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ढाके कॉलनीस्थित सेवाकेंद्रात शिक्षण प्रभागातर्फे आयोजित सन्मान प्रसंगी ते बोलत होते. .ते पुढे म्हणाले की, मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी ज्या अशासकीय शिक्षण संस्था पुढे सरसावल्या आहेत त्या ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभागाचे कार्य लाखमोलाचे आहे. भारतातील नामांकित विद्यापीठांनी त्यांच्या अभ्यासक्रमात ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभागाच्या सहकार्याने मूल्यशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरु केले आहेत यातच त्यांच्या कार्याची ओळख होते. समाजात प्रत्येक क्षेत्रात नैतिक, चारित्रीक, सामाजिक मूल्यांची सातत्याने होत असलेली घसरण पाहता येणा-या काळात मूल्यशिक्षणाचा समावेश केवळ प्राथमिक पातळीवर नव्हे तर उच्च शिक्षण पातळीपर्यंत करावा लागेल, आणि त्यासाठी शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांचे सहकार्य विद्यापीठांना घ्यावे लागेल.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारशाळा प्रशाळांद्वारे विविध अध्यासन केंद्रामार्फत मूल्यसंस्कार, शिक्षण विचार समाजात पोहचविण्याचे कार्य होत आहे. ब्रह्माकुमारीज् शिक्षण प्रभागामार्फत ज्या प्रमाणे भारतातील इतर विद्यापीठांचे अभ्यासक्रम सुरु आहेत तसेच अभ्यासक्रम आपल्या विद्यापीठापीठामार्फतही सुरु करणे संदर्भात भविष्यात विचार करणेत येईल असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. प्रास्तविकात डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी शिक्षण प्रभागामार्फत सुरु असलेल्या कार्यक्रम, उपक्रमांचा आढावा घेतला. ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांच्या हस्ते प्रा. इंगळे यांचा विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु म्हणून निवड झाल्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला. आभार डॉ. किरण पाटील यांनी मानले.

Exit mobile version