Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जंगी शक्तीप्रदर्शन करून संदीप शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनतेच्या हिताची प्रामाणिक तळमळ असेल, हेतू स्वच्छ असेल तर जनता तुम्हाला प्रचंड पाठींबा देते, आजचा विराट जनसमुदाय त्याची साक्ष आहे.आतापर्यंत खासदारांनी विकासाच्या नावावर चॉकलेट देण्याचं काम केलं. जिल्हा बिघडवण्याचा काम केलं, अशा निष्क्रिय खासदाराला हद्दपार करा, मला जनतेने सेवेची संधी दिल्यास मी खासदार म्हणून नव्हे तर तुमचा नोकर म्हणून तुमचा सेवक म्हणून तुमचा विश्वास म्हणून काम करेल. मी अपक्ष म्हणून जरी उमेदवारी अर्ज दाखल करीत असलो तरी आपल्याकडे विकासाचे पक्के व्हिजन आहे,जिल्ह्याची जनता परिवर्तन मागत आहे असे प्रतिपादन वन बुलडाणा मिशनचे संकल्प संदीप शेळके यांनी केले. आज ३ एप्रिलच्या मुहूर्तावर संदीप शेळके यांनी बुलढाणा लोकसभेसाठी नामांकन अर्ज दाखल केला, त्यापूर्वी जिजामाता प्रेक्षागार मैदाना शेजारील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात जाहीर सभेला संदीप शेळके यांनी संबोधित केले यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना संदीप शेळके म्हणाले की, अनेक दृश्य अदृश्य हात आपल्यासोबत आहेत. काही लोकांवर प्रचंड दबाव आहे, मात्र दबाव झुगारून लोक आता परिवर्तन मागत आहेत.इथे जमलेली गर्दी हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है असे संदीप शेळके म्हणाले. वन बुलडाणा मिशन ही पहिली चळवळ आहे जिथे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते. आपल्याला जिल्ह्याचा सर्वांगीण सर्वव्यापी विकास करायचा आहे. यावेळी विद्यमान खासदार जाधवांवर संदीप शेळके यांनी टीकेची तोफ डागली. त्यांनी संसदेत सोयाबीन कापसावर प्रश्न विचारले नाही, जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल ते बोलत नाहीत.त्यांना जिल्ह्याचे प्रश्नच माहीत नाहीत. केवळ भूलथापा मारायचा, भावनिक राजकारण करायचे आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घ्यायची असेच राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं.त्यामुळे गेल्या १५ वर्षात जिल्हा ५० वर्षे मागे नेण्याचं पाप त्यांनी केल्याचे संदीप शेळके म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या अंतर्गत कलहावर देखील संदीप शेळके यांनी भाष्य केले. भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रमुखांनी उमेदवारी अर्ज भरला, शिंदे गटाचे मंत्री त्यांना त्यांची औकात दिसून येईल म्हणतात, भाजपच्या नेत्याची औकात काढण्यापर्यंत मजल गेल्यावर भाजपवाले खासदाराला मदत करतील का? असा सवाल त्यांनी केला. महायुती आणि महाविकास आघाडीत आलबेल नाही,त्यांची लढाई सत्तेसाठी त्यांच्या स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी आहे आपली लढाई ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असे संदीप शेळके म्हणाले.

जिल्ह्यातले प्रस्थापित पुढारी जनतेच्या हिताची कामे करीत नाहीत तर ज्यातून नेत्यांना माल मिळतो अशीच कामे करतात असे ते म्हणाले. बुलडाणा चिखली शहरात एन्ट्री करतात मोठमोठ्या कमानी दिसतात,२५- ५० लाखांच्या त्या कमानी आहेत, त्याच काय लोणचं घालायचं का? असा सवाल करीत तेवढ्या पैशात शेतकऱ्यांचे १० पांदनरस्ते झाले असते असे संदीप शेळके म्हणाले. मात्र आता लोक प्रस्थापित पुढाऱ्यांना कंटाळले असून आता वन बुलडाणा मिशनचा आवाज दिल्लीत पोहचणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. शेतकऱ्यांचे सिंचन, पांदन रस्ते, जिल्ह्यात एमआयडीसी, तरुणांना रोजगार, महिला सक्षमीकरण , गावोगावी रानिंग ट्रॅक, क्रीडांगण या मुद्द्यावर आता निवडणूक होणार आहे. जनतेने मतांचे दान आपल्याला द्यावे, तुमच्या प्रत्येक मताचा हिशोब देईल असे संदीप शेळके म्हणाले. जाहीर सभेनंतर शेळके यांनी भव्य रॅली काढली.संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गे ही मिरवणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचली त्यानंतर संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला.

Exit mobile version