Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे केवळ हिंदूंचे राजे नव्हते, असं म्हणतं औरंगाबादच्या नामांतराबद्दल पुन्हा पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसने या नामांतराला विरोध दर्शवला आहे. शहरांची नावं बदलण्याची आपली भूमिका नसल्याचे काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

ट्विटवर सावंत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे रयतेचे राजे होते, केवळ हिंदूंचे नव्हते. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या मुलांचे नाव शहाजी आणि शरीफजी ठेवले होते ते तत्कालीन सुफी संत शाह शरीफजी यांच्यावरील श्रध्देपोटी. त्यांचे एक तृतीयांश सैन्य मुस्लिम होते.”

ते केवळ मराठा समाजाचे राजे नव्हते तर अठरापगड जातींचे राजे होते. ज्या विचारांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्यांनी संभाजी महाराजांनाही विरोधच केला. त्याकाळी जातीविरहीत धर्मनिरपेक्ष राज्य या महापुरुषांनी, आमच्या दैवतांनी स्थापन केले,” असे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद महापालिकेची आगामी काळात निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यावरुन भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला जात असतानाच भाजपाने मात्र शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि राज्यात भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेनं राज्य सरकारकडे नामांतराचा प्रस्ताव का पाठवला नाही? असा सवाल भाजपा नेते राम कदम यांनी केला आहे.

Exit mobile version