Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मस्तवाल प्रतिक्रिया !

बंगळुरू वृत्तसंस्था | कानडी समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करून याचा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कर्नाटकातील मराठी समुदायात संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. तर राज्यातील नेत्यांनी देखील याचा निषेध केला आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही बाब अतिशय छोटीशी असल्याचे वक्तव्य करून आगीत तेल ओतले आहे.

कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याचे समोर आल्याने मराठी लोक संतापले आहेत. संतापजनक बाब म्हणजे काळा रंग ओतल्याचा व्हिडीओ कन्नड समाजकंटकांनी व्हायरल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे पडसाद बेळगाव आणि कोल्हापूरमध्ये उमटले. रात्री उशिरा बेळगावमधील संभाजी महाराज चौकात मराठी भाषक जमले आणि रास्ता रोको केला तर यावेळी संतप्त शिवप्रेमी हुतात्मा चौकातील पोलिसांची गाडी फोडली, रामदेव गल्लीत एका रिक्षा चालकाला मारहाण केली. कोल्हापूरमध्ये कन्नड भाषकांची दुकान आणि हॉटेल बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे.

बंगळुरू येथील कृत्याचे व्यापक पडसाद उमटले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संभाजीराजे भोसले आदींसह अन्य नेत्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणी अतिशय धक्कादायक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही. यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही घटना छोटीशी असल्याचे वक्तव्य करून मराठी जनतेला खिजवले आहे. यामुळे आता बोम्मई यांच्या विरोधात देखील प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Exit mobile version