Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्यावर महिलेच्या चेहऱ्यावर समाधान !

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय विद्यालय परिसरात रिक्षाने आलेल्या महिलेच्या पर्समधून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचा सोन्याचा दागिना चोरीला गेला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी चार चोरट्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशान्वये सोन्याचे दागिने महिलेला देण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अंकिता प्रतीक पाटील (वय-२५) रा. पोलिस क्वाटर, अहमदनगर या त्यांच्या आई सोबत मालेगाव होऊन चाळीसगाव येथे शहरात २७ जानेवारी लग्नासाठी आल्या होत्या. दरम्यान गावातील राष्ट्रीय विद्यालय समोरून त्याचा रिक्षात बसून हिरापूर येथे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कपड्याच्या बॅगेतून ५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्याचा बॉक्स चोरून नेला होता. यासंदर्भात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक नितीन आमोदकर करीत होते.

दरम्यान, गोपनीय माहितीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल युवराज नाईक, पोलीस नाईक नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी संशयित आरोपी अजय अंबादास घुमडकर (वय-२३, रा. संतोषी माता मंदिर, चाळीसगाव), रवींद्र मल्लू घुमडकर (वय-३५) रा. टाकळी ता.चाळीसगाव, विकी बाबुराव घुमडकर (वय-२४) रा. खरजई रेल्वे स्टेशनजवळ चाळीसगाव आणि नितेश शिवाजी पंच (वय-२१) रा. पंचवटी नाशिक या चौघांना ३ फेब्रुवारी रोजी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्या ताब्यातून २७ हजार ५०० रुपये रोख आणि ५ लाख ८४ हजार ७०० रुपये किंमतीचा १३ तोळ्याची सोन्याची लगड असा एकूण ६ लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार सोन्याचा दागिने मूळ फिर्यादी अंकिता पाटील यांना देण्यात आला आहे.

Exit mobile version