Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीप्रकरणी पाच महिलांना एक वर्षाची शिक्षा

जळगाव प्रतिनिधी | शहरातील महाबळ परिसरातील नुतन वर्षा कॉलनीतील घरातून दीड लाखांचा मुद्देमाल लांबवून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात न्यायालयाने संशयित पाच महिलांना दोषी ठरवून एका वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नुतन वर्षा कॉलनीतील सतिष दामोदरे यांच्या घरातून दीड लाखाचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात कल्पना धनराज हातागडे रा. राजीव गांधी नगर, रंजना सुरेश रणसिंग, रचन अनिल खलसे, लताबाई सदाशिव खंडारे रा. तिघे हरिविठ्ठल नगर व जमुनाबाई गोरख कांबळे रा. राजीव गांधी नगर या पाच महिलांना पोलीसांनी अटक केली होती. रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सुजाता राजपूत यांनी या गुन्ह्याचा तपास करून संशयितांना अटक करीत दोषारोपपत्रक दाखल केले. न्या. सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात या गुन्ह्याचे कामकाज होवून न्यायालयात १० साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी व पुराव्यांवरून न्यायालयाने संशयित पाचही महिलांना भादवी कलम ४५४, ३८० खाली दोषी ठरवून १ वर्षाची शिक्षा, प्रत्येकी ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची साधी कैद सुनाविण्यात आली आहे.

Exit mobile version