Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोरीचा पैसा चोराच्या हृदयविकारावरच खर्च झाला !

 

लखनौ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमध्ये एका चोराला चोरीदरम्यान अनपेक्षितपणे जास्त रोख रक्कम मिळाल्याने एवढ्या आनंद झाला की त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळेच चोरी केलेल्या रक्कमेमधील बराचसा भाग या चोराला स्वत:वरील उपचारांसाठी खर्च करावा लागला.

 

 

बिजनौर येथील कोठीवाडा ग्रामीण भागातील सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये झालेल्या चोरीसंदर्भात बुधवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये दोन जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांपैकीच पोलिसांच्या हाती लागलेल्या एका चोराने चोरीचा बराचसा पैसा उपाचारांवर खर्च करण्यात आल्याचं चौकशीदरम्यान सांगितलं आहे.

 

बिजनौरचे पोलीस अधीक्षक धरमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन चोरांनी नवाब हैदर यांच्या मालकीच्या सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये डल्ला मारला. १६ आणि १७ फेब्रुवारीच्या रात्री ही चोरी झाली. त्यानंतर हैदर यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल करत केंद्रातून सात लाख रुपये चोरीला गेल्याचं आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पोलिसांनी  दोघांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं. नौशाद आणि अजीज असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नाव आहेत. हे दोघेही अलिपूर आणि नगिना पोलीस स्थानकाच्या हद्दीतील रहिवाशी आहेत. पोलिसांनी एका रेस्तराँमधून या दोन्ही आरोपींना पाळत ठेऊन अटक करण्यात आल्याची माहिती दिली.

 

“दोन्ही आरोपी सराईत चोर आहेत. त्यांच्याविरोधात अनेक पोलीस स्थानकांमध्ये तक्रारी दाखल आहेत. त्यांनी सार्वजनिक सेवा केंद्रामध्ये सात लाखांची चोरी केल्याचा गुन्हा कबुल केलाय. या केंद्रामध्ये काही हजार रुपये आपल्याला मिळतील असा अंदाज चोरांनी लावल्याची माहिती दिलीय. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त पैसा या दोघांना या केंद्रातून मिळाला. त्यांनी मिळालेले पैसे अर्धे अर्धे वाटून घेतले. मात्र त्यानंतर लगेचच अजीजला हृदयविकाराचा झटका आला आणि उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या साडेतीन लाखांपैकी बराच पैसा अजीजने उपचारांवर खर्च केला. नौशादने त्याला मिळालेले पैसे दिल्लीत सट्ट्यामध्ये उडवले,” असं सिंह यांनी सांगितलं आहे.

 

या दोघांकडून पोलिसांनी ३.७ हजार रुपये रोख रक्कम, दोन पिस्तुल आणि एक चोरलेली बाईक अशा गोष्टी ताब्यात घेतल्यात.

Exit mobile version