Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपड्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला कठोरेकरांचा विरोध कायम

चोपडा प्रतिनिधी । चोपडा शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी तापी नदीच्या पात्रात पंपींग स्टेशनच्या कामाला तालुक्यातील कठोरा येथील ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवल्याने या योजनेच्या कार्यान्वयनात अडचण निर्माण झाली आहे.

याबाबत वृत्त असे की, कठोरा गावाजवळच्या तापी नदीच्या पात्रात चोपडा नगरपालिकेच्या नव्याने सुरू असलेल्या दुसर्‍या पाईपलाईन आणि पंपिंग स्टेशनच्या कामास विरोध होऊ लागला आहे. याला कठोरा येथील ग्रामस्थांनी विरोध करून आपल्या मागण्या सादर केल्या आहेत. यात संबंधीत योजनेसाठी नियमानुसार तापी नदी पात्रात बांध धरण करणे आवश्यक आहे. पण नगरपालिका किंवा तापी महामंडळ यांच्याकडून जुन्या आणि नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी कोणताही उपाययोजना केलेल्या नाहीत. जर बांध अथवा धरण करणे शक्य नसेल तर, तापी नदी पात्रात बारमाही जिवंत जलसाठा असणे बंधनकारक व्हावे, त्यासाठी तापी नदीपात्रातील कठोरा हद्दीतील डोहाचा मजिवंत जलसाठा आणि मृत जलसाठाफयाची व्याख्या तयार करण्यात यावी आणि त्यानुसार नदीपात्रात दिशानिर्देश लावण्यात यावेत. मृतसाठेतून पाणी उपसा बंदीसाठी कठोरा ग्रामपंचायत,चोपडा नगरपालिका आणि तापी महामंडळ यांच्यात अधिकृत करार व्हावा. तापी पात्रातील पाणी उपसा यातून निर्माण होणार्‍या उत्पन्नातुन कठोरा ग्रामपंचायतला रॉयल्टी स्वरूपात उत्पन्न दयावे अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

दरम्यान, कठोरा ग्रामस्थांचा विरोध असतांनाही काम सुरू केल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.५ रोजी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी कठोरे गावाला भेट देऊन शेतकर्‍यांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी गावकर्‍यांच्या सर्व मागण्या ऐकून घेतल्यात आणि सर्व मागण्या जिल्हाधिकारी यांच्यापुढे मांडणार आहेत. आणि पुढील बैठक जिल्हाधिकारी यांच्या सोबत होणार असल्याची ग्वाही दिली.

याप्रसंगी उपअधीक्षक संदीप जाधव, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरिक्षक संदीप आराक, आणि नगरपालिकेचे अभियंता सचिन गवांदे, जीवन प्राधिकरण अभियंता एस.एन.वानखेडे, मनोज शिंदे, पोलीस पाटील, आनंदा पाटील, सरपंच सरपंच चित्राबाई अधिकार पाटील, उप सरपंच राजेंद्र बाविस्कर, ग्रामसेवक आर.ए.पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version