Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा महाविद्यालयात ‘नोकरी मार्गदर्शन मेळावा’ संपन्न

 

चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविदयालयातील ‘ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट सेल’ तर्फे दि.२७ व २८ फेब्रुवारी यादरम्यान दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ‘नोकरी मार्गदर्शन मेळावा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कै. शरच्चंद्रिका सुरेश पाटील (माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत विभागातील विद्यार्थीनीनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता संदीप पाटील (सचिव, महात्मा गांधी शिक्षण मंडळ, चोपडा जि.जळगाव) उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शक सुबोध जाधव (Lead-Mobilization & Placement), श्रुती राजूरकर (Team Member & Banking Trainer), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, डॉ.के.डी.गायकवाड (समन्वयक, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट सेल) आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.के.डी.गायकवाड प्रास्ताविक करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळाव्यात, नोकरीनिमित्त व्यक्तिमत्व विकासाची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी, योग्य, हुशार विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

या कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना नोकरी मिळावी, अंगी असणाऱ्या कर्तृत्व गुणांना व्यासपीठ मिळावे, विद्यार्थी विकासाच्या व रोजगार उपलब्धीच्या उद्देशाने आमच्या महाविद्यालयात अनेक मेळाव्यांचे आयोजन करून संधी उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले जाते. नोकरी मिळविण्यासाठी आजची काळात खूप संघर्ष करावा लागतो. यासाठी कोणत्यातरी लहान मोठ्या कामांचा स्वीकार करून त्यात आपली प्रगती करायला हवी. या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून योग्य निवड करून त्यांची नोकरीसाठी तयारी करवून घेण्याचे काम महाविद्यालयातर्फे केले जाते.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्रीमती श्रुती राजूरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, आमच्या बँकांच्या महाराष्ट्रात अनेक शाखा उपलब्ध आहेत. या नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यामागे एकच उद्देश आहे की, बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, या नोकरींच्या संदर्भात मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करणे, नोकरीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता व अटी यांची ओळख करून देणे हा असतो. त्याबरोबरच नोकरीसाठी विद्यार्थ्यांजवळ आकर्षक व्यक्तिमत्व, उत्तम संवाद कौशल्य, सादरीकरण कला, विनम्रपणा, प्रामाणिकपणा या गोष्टी देखील महत्वाच्या असतात. विद्यार्थ्यांची निवड करतांना विद्यार्थ्याची मानसिक तयारी, इंग्रजी विषयाचे ज्ञान, लेखन कौशल्य आणि संवाद कौशल्य या बाबी तपासून निवड केली जाते, विद्यार्थ्यांनी महाविद्यालय संधी उपलब्ध करून दिली जाते याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री.सुबोध जाधव विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तरीपण या महाविद्यालयातील विद्यार्थी नोकरी मार्गदर्शन मेळाव्यात येऊन धडपड करतात ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घ्यावा. विद्यार्थ्यांनी निराश न होता जिद्द, चिकाटी हवी तसेच संवाद कौशल्याचा विकास करायला हवा. यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या ‘ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट सेल’ व टाटा स्ट्राईव्ह कंपनी यांच्यात नोकरी संदर्भात करण्यात आलेले करार पत्र संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांना सुपूर्द केले.

संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी व्यक्तिमत्व विकास तसेच संवाद कौशल्य या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. या सर्व घटकांची तयारी व्हावी यासाठी महाविद्यालयात नोकरी मेळाव्यांचे आयोजन करून करिअरची संधी उपलब्ध करून दिली जाते. रोजगार प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास, संवाद कौशल्य यांचा विकास करावा.

या कार्यक्रमाचे आभार सुनिता पाटील यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.आर.आर.पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी एम.एल.भुसारे, डॉ.पी.एम.रावतोळे, डी.डी.कर्दपवार, मयूर ए.पाटील, सौ.एस.बी.पाटील, ए.एच.साळुंखे, डॉ.एच.जी.सदाफुले यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version