चीनमधून सोळाशेहून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये गुंतवणूक

नवी दिल्ली वृत्तसंस्था । एप्रिल २०१६ ते मार्च २०२० या कालावधीत चीनमधून सोळाशेहून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे.

भारतीय कंपन्यांमध्ये विशेषत: स्टार्ट-अप्समध्ये चिनी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे हे खरे आहे काय, या राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी लेखी उत्तर दिले.

विविध ४६ क्षेत्रांमधील या कंपन्या असून त्यापैकी वाहन उद्योग, पुस्तक छपाई (लिथो मुद्रण उद्योगासह), इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि विद्युत उपकरणे या क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये दहा कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक थेट गुंतवणूक करण्यात आली आहे. चिनी कंपन्यांनी वाहन उद्योगात सर्वाधिक १७.२ कोटी अमेरिकी डॉलर, तर त्या खालोखाल सेवा क्षेत्रामध्ये १३.९ कोटी अमेरिकी डॉलर गुंतवणूक केली आहे.

Protected Content