Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात

बीजिंग वृत्तसंस्था । काही दिवसांपूर्वी युरोपच्या दौऱ्यावर गेलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या हाती आलेल्या अपयशानंतर आता राष्ट्रपती शी जिनपिंग स्वत: डॅमेज कंट्रोलसाठी मैदानात उतरले आहेत. सोमवारी जिनपिंग यांनी जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांच्यासह युरोपीयन युनियनच्या अनेक नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. युरोपीयन युनियन आणि चीनमधील संबंधात आलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्त्वाची समजली जाते.

हाँगकाँगमध्ये चीनने नवीन सुरक्षा कायदा लागू केला आहे. या कायद्याला युरोपीयन युनियनमधील अनेक देशांनी विरोध दर्शवला आहे. या कायद्यामुळे हाँगकाँगची स्वायत्ता कमी होत असल्याचा आक्षेप युरोपीयन युनियनने घेतला होता. अनेक देशांनी हाँगकाँगसोबतचे आपले संबंध, व्यापार कमी केले आहेत. यामध्ये जर्मनी आणि फ्रान्स या देशांचाही समावेश आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यापार, गुंतवणूक कराराच्या अनुषंगाने व युरोपीयन युनियनसोबतच्या संबंधांवर परिणाम करणाऱ्या राजकीय व इतर मुद्यांवर चर्चा केली असल्याचे समजते. चीन आणि युरोपीयन युनियनमध्ये विश्वासाचे वातावरण तयार व्हावे यासाठी जिनपिंग यांनी पुढाकार घेतला आहे. चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे आणि कोरोनाच्या आरोपांमुळे जगभरात चीनविरोधात वातावरण तयार झाले आहे. चीनला सावरण्यासाठी आणि इतर देशांसोबतचे संबंध टिकवण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या आहेत.

युरोपीयन युनियनमधील अनेक देशांचे चीनबद्दल चांगले मत नाही. युरोपीयन युनियन हा चीनचा सर्वात मोठा व्यापार क्षेत्रातील भागिदार आहे. तरीदेखील २७ देशांचा चीनबद्दल वेगवेगळा दृष्टीकोण आहे. काही देशांच्या मते चीन हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे युरोपीयन देशाच्या दौऱ्यावर होते. मात्र, या दौऱ्यात त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. बर्लिनमध्ये चेक प्रजासत्ताकचे सिनेट अध्यक्ष मिलोस वीसट्रिसील यांच्या तैवान दौऱ्याला घेऊन वांग यांनी त्यांना धमकी दिली होती. मात्र, त्यानंतर जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी वांग यांना सुनावताना या मंचाचा वापर कोणत्याही युरोपीयन देशाविरोधात केला जाऊ देणार नसल्याचे म्हटले होते.

Exit mobile version