Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चीनचा भारतावर घुसखोरीचा आरोप

बीजिंग: वृत्तसंस्था । . भारतीय सैन्याने पॅन्गाँग सरोवराजवळील एका डोंगरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चिनी सैन्याने भारतीय सैन्याला माघारी पाठवले असल्याचा दावा चिनी माध्यमांनी केला आहे. या आरोपाच्या पुष्टीसाठी एक व्हिडिओही जारी केला आहे.

चीनचे सरकारी टीव्ही चॅनेल सीजीटीएन या वृत्तवाहिनीचे पत्रकार शेन शिवेई यांनी भारतीय सैन्याकडून चित्रित केलेला व्हिडिओ शेअर करून हा दावा केला आहे. शिवेई यांनी सांगितले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांजवळ चीनचा झेंडा दिसत आहे. हे सैन्य पॅन्गाँग सरोवराजवळील एका टेकडीवर होते. भारतीय सैन्याने अधिक ताबा मिळवू नये यासाठी चिनी सैन्य सजग होते, असेही त्यांनी म्हटले. चीनच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ कधी आणि कोणत्या ठिकाणी चित्रीत केला आहे, याबाबतची काहीही माहिती समोर आली नाही. व्हिडिओत भारतीय सैनिक हिंदी आणि तिबेटी भाषा बोलताना दिसत आहेत. लडाखमधील काही महत्त्वाच्या ठिकाणी भारत-चीनचे सैन्य आमने सामने आहे. या दरम्यान चिनी सैन्याने कडाक्याच्या थंडीशी मुकाबला करण्यासाठी एक अत्याधुनिक बॅरक उभारली आहे. ही बॅरक पॅन्गाँग सरोवराजवळ असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये हजारो चिनी सैन्याचे जवान, शस्त्रास्त्रे आणि दारू गोळ्याचा साठा राहू शकतो.

लडाखची थंडी सहन करण्यासाठी भारतीय सैन्य अनेक प्रकारच्या उपकरणांचा वापर करणार आहे. थंडीच्या दिवसात चीन आपल्या सैन्याला माघारी बोलावू शकतो अशी चर्चा सुरू आहे.

 

Exit mobile version