Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चिपळूणमध्ये ढगफुटीमुळे भीषण स्थिती

 

रत्नागिरी : वृत्तसंस्था । रात्रभर झालेल्या ढगफुटीमुळे चिपळूण जलमय झालं आहे. पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. 

वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. यामुळे २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना लागून राहिली आहे. शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले आहे. दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली आहे. शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. एनडीआरएफची तुकडी पुण्याहून चिपळुणात दाखल झाली आहे.

२६ जुलै २००५ ला ढगफुटी झाल्यामुळे चिपळूण शहरात आणि खेर्डी बाजारपेठेत पाणी साचले होते. कोट्यवधींची हानी झाली होती. यावर्षीही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्याने चार दिवस हाय अलर्ट राहण्याचा इशारा दिल्यामुळे आणि सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना केल्या होत्या.

मुंबई- गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने शेकडो लोक पाण्यात अडकले आहेत. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.

रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बस स्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदर्कर आळी, मुरादपूर रोड, एसटी स्टँड ,भोगाळे ,परशूराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.

संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले असून रामपेठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. मारुती मंदिर देवरुख मार्गावर पाणी चढण्याची शक्यता आहे

काजळी नदीला पूर आल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील बाजारपेठेत पहाटे दोन वाजल्यापासून पाणी भरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सर्व साहित्य बाहेर घेण्यास सुरुवात केली आणि सर्व साहित्य सुरक्षितस्थळी नेले. आत्ताच्या घडीला बाजारपेठेत पाणी वाढत आहे, काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. सोमेश्वरकडे जाणार मार्ग बंद करण्यात आला आहे. हातीस, टेंभे येथेही पूरसदृश स्थिती आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी विभागातील चिपळूण आणि कामठे स्थानक दरम्यान वशिष्ठ नदी पुलाची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या विभागातील रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केल्या आहेत.

 

Exit mobile version