मुंबई वृत्तसंस्था । राज्याती लॉकडाऊन असले तरी नागरीकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा मिळणार आहेत. त्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करत असून जनतेचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना धान्याऐवजी थेट पीठ देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाहीत. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून हार्वेस्टिंग मशीन आणण्यात आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल, असं थोरात यांनी सांगितलं.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा आशयाच्या सूचना आम्ही प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून ही वाहतूक सुरळीत केली जाते आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.