घरीच नमाज पठण करा : पोलिसांचे आवाहन

पाचोरा, प्रतिनिधी ।  आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाच्या निर्देशानुसार घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले. 

 

बैठकीत शासन आदेशानुसार स्तर – ३ चे निर्बधं लागू आहे. त्यानुसार कोविड – १९ कोरोनाचा वाढता प्रदुर्भाव या अनुषंगाने सण, उत्सव मशीद अथवा ईदगाह तसेच सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण न करता घरीच अदा करावेत अशी सूचना करण्यात आली. कोरोनाच्या डेल्टा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. परिस्थितीचा विचार करता यावर्षी बकरी ईद उत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याकरीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या आहेत. या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या सामूदायिक नमाज पठणाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुस्लिम बांधवांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करीत घरीच नमाज पठण करावे,असे पाचोरा पोलिस स्टेशन येथे आयोजित बैठकीत योग्य सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचारी सुनिल पाटील, किशोर पाटील, राहुल बेहरे, किशोर पाटील, नितीन पाटील, पत्रकार जावेद शेख सह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Protected Content