Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरकूलमधून सुरेशदादा व खान्देश बिल्डर्स निर्दोष सुटणार- बालाणींचा दावा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । घरकूल गैरव्यवहार प्रकरणात दाखल केलेल्या अपिलात सुरेशदादा जैन आणि खान्देश बिल्डर्स निर्दोष सुटणार असल्याचा दावा भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महानगर शिवसेनेतर्फे रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे गटनेते भगत बालाणी यांच्यासह सत्ताधार्‍यांवर आरोपांची सरबत्ती करत जोरदार टीकास्त्र सोडले होते. या पार्श्‍वभूमिवर, बालाणी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याला प्रत्युत्तर दिले आहे. यात त्यांनी पहिल्यांदाच सांगितले की, विरोधकांनी आपल्यावर वैयक्तीक आरोप केले असले तरी आपण याला उत्तर देणार नाही. आणि आपण विरोधकांवर वैयक्तीक आरोप करणारदेखील नाही. महापालिकेत सत्ताधारी भाजपतर्फे शहर विकासाच्या कामांना गती दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर वॉटरग्रेस कंपनीचा ठेकेदार हा कसा आहे याची माहितीदेखील आपल्याला नसल्याचा दावा बालाणी यांनी केला.

दरम्यान, घरकूलमध्ये दोषी ठरल्यानंतर महापालिकेतील सुरेशदादा जैन यांची प्रतिमा काढण्यात आल्यावरून विचारणा केली असता ते म्हणाले की, गत ऑक्टोबर महिन्यात घरकूल खटल्यात शिक्षा झाल्यानंतर आम्ही भाजपचे पाचही नगरसेवक काही काळ दादांसोबत कारागृहात होतो. या काळात दादांची महापालिकेतील प्रतिमा काढण्यात आली. यामुळे आपला याच्याशी काही संबंध नाही. तसेच याबाबत शिवसेनेने प्रशासनाला विचारणा करावी असा सल्लादेखील त्यांनी दिला. आजही दादांची प्रतिमा पुन्हा लावण्यात यावी असा ठराव आल्यास आपले याला समर्थन राहील अशी माहिती त्यांनी दिली. यानंतर ते म्हणाले की, सुरेशदादा जैन आणि खान्देश बिल्डर्सच्या मक्तेदारांनी शिक्षेच्या विरोधात अपील केले असून यात ते निर्दोष सुटतील अशी आपल्याला अपेक्षा आहे.

सध्या महपालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये जोरदार जुंपली असतांना भाजपच्याच गटनेत्याने दादांच्या निर्दोषत्वाबाबत आशावाद व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पहा भगत बालाणी पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणालेत ते ?

Part 1 :

Part 2 :

Exit mobile version