Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

घरकुल घोटाळ्यातील दोषी ५ नगरसेवकांचे भवितव्य आता कोर्टात

 

जळगाव, प्रतिनिधी । घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावलेल्या आरोपींमधील विद्यमान पाच नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत आज कामकाज सुरू झाले असून दोषी नगरसेवकांना नोटीस काढण्यात आली आहे.

घरकुल प्रकरणातील दोषी कैलास सोनवणे, लता भोईटे, दत्तात्रेय कोळी, भगत बालाणी व सदाशिव ढेकळे नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आयुक्तांकडे डिसेंबर २०१९ रोजी केली होती. घरकुलमध्ये दोषी ठरलेले ४८ पैकी ५ नगरसेवक विद्यमान आहेत. घरकुल प्रकरणात दोषी ठरल्याने पाचही नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे अशी मागणी श्री. गुप्ता यांनी केली होती. आयुक्त टेकाळे यांनी पाचही नगरसेवकांची गुप्ता यांच्यासमोर सुनावणी घेत याबाबत न्यायालयच निर्णय घेऊ शकते असे सांगत कारवाईस नकार दिला होता. याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देखील निवेदन दिले आहे.  दीपककुमार गुप्ता यांच्या पाठपुरावा नंतर शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी १६ मार्च रोजी दावा दाखल केला होता. याचवेळी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने आज ७ नोव्हेंबर रोजी न्या. जे. जी. पवार यांच्या न्यायालयात यावर कामकाज होऊन ५ ही नगरसेवकांना नोटीस काढण्यात आली आहे. प्रशांत नाईक यांच्याकडून अॅड. सुधीर कुलकर्णी यांनी कामकाज पहिले.

Exit mobile version