ग.स.सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया

जळगाव -जिल्ह्यात संसर्ग प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेली ग.स. सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. निवडणूक अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ मार्च असून २८ एप्रिलला मतदान तर ३० ला मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकार विभाग प्रशासनाने दिली.
गेल्या दोन वर्षापासून संसर्ग प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा बँकेसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांनी जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची पतपेढी जळगाव या संस्थेची २०२१-२०२६ पंचवार्षिक साठी निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
ग.स.सोसायटी निवडणूकीसाठी स्थानिक ५, बाहेरील ११, अनु.जाती-जमाती १, महिला राखीव २, इतर मागासवर्ग १, ब.जाती-जमाती वि.मा.प्र.१ असे एकूण २१ सदस्य निवडले जाणार आहेत. निवडणुकीसाठी २५ ते ३१ मार्च दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारणे, १ एप्रिल रोजी छाननी, ४ एप्रिल वैध पात्र उमेदवार यादी प्रसिद्धी, ४ ते १८ एप्रिल दरम्यान अर्ज माघार, १९ रोजी उमेदवार चिन्ह वाटप, २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान तर ३० एप्रिल रोजी मतमोजणी केली जाणार असून त्याच दिवशी मतमोजणी नंतर निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी म्हटले आहे.

Protected Content