Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामीण भागासह तालुक्यातील मुख्य रस्त्यांची दुरुस्तीची काँग्रेसची मागणी

 

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील मुख्य रस्त्यांसह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली असून त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी चोपडा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे .या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी पी.जे. सुशिर यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील,तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिले.

तालुका काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चोपड़ा शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यात प्रामुख्याने चोपड़ा अमळनेर या रस्त्याची अवस्था खूपच वाईट आहे. तसेच निमगव्हाण पासून ते रेल मारुती मंदिरा पर्यंत रस्त्यात मोठमोठे खड्डे आहेत आणि वेले ते चोपडा दरम्यानही रस्त्याची अवस्था दयनीय आहे. यासोबतच चोपड़ा शिरपूर रस्ता यावरही मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. विशेषतः हॉटेल जयेश जवळ गेल्या तीन वर्षांपासून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. चोपडा यावल रस्त्याची अवस्था ही दयनीय आहे. या रस्त्यावरही काही भागात खूप मोठमोठे खड्डे आहेत. यासह चोपड़ा अमळनेर रस्त्यावर रेल मारुती जवळ असलेल्या वळणावरील दुतर्फा मोठमोठे वृक्ष वाढल्याने येणारी-जाणारी वाहने एकमेकांना दिसत नाहीत, म्हणून त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि चोपड़ा शिरपूर बायपास रस्त्यावरही कमलोदिन बाबा दर्गा जवळ असलेल्या वळणावर दुतर्फा खूप मोठी झाडे आणि गवत वाढल्याने येणारे व जाणारे वाहने चालकांना दिसत नाहीत. यापूर्वीच या वळणावर खूप मोठे मोठे अपघात होऊन एकाच वेळेस दहा दहा जणांचा बळी गेलेला आहे. यासह ग्रामीण भागातल्या रस्त्यांची ही अवस्था अत्यंत बिकट आहेत हे सर्व रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. अन्यथा जळगाव जिल्हा आणि चोपडा तालुका काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा चोपडा शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.निवेदनावर तालुकाध्यक्ष राजाराम पाटील,शहराध्यक्ष के डी चौधरी,विनायक सोनवणे, मधुकर बाविस्कर, ऍड. संदेश जैन, व्ही. एस. भदाणे, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, एन. एस. यु. आय. अध्यक्ष चेतन पाटील, जगन्नाथ पाटील ,प्रदीप पाटील, गणेश पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version