Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना मिळणार ५०० नविन रुग्णवाहिका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५०० नविन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नविन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

 

यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, मार्च मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या १००० रुग्णवाहिका टप्प्या टप्प्याने बदलून त्याजागी नविन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. यावर्षी ५०० आणि पुढील वर्षी ५०० अशा नविन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहिर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्ती योग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत.

 

यावर्षी ५०० नविन रुग्णवाहिका घेण्यासाठी ८९ कोटी ४८ लाख अंदाजीत खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नविन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. या ५०० नविन रुग्णवाहिका २५३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३७ ग्रामीण रुग्णालये, १०६ जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि ४ प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टिकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नविन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Exit mobile version