Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्जही स्वीकारणार — जिल्हाधिकारी राऊत

 

जळगाव, प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुक लढविण्यास इच्छुक उमेदवारी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये, त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने अर्ज पारंपरिक पध्दतीने स्वीकारण्याचा तसेच अर्ज दाखल करण्याची वेळही ३० डिसेंबर, रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वाढवून दिली आहे. अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने माहे एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावाधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यानुसार संगणक प्रणालीद्वारे अर्ज दाखल करण्यास २३ डिसेंबरपासून सुरवात झाली. ३० डिसेंबर, २०२० अशी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या कालावधीत संगणक प्रणालीत राज्यातून ३ लाख ३२ हजार ८४४ एवढे अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, अर्ज दाखल करताना २८ डिसेंबर, रोजी सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी, तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

Exit mobile version