Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गौरव पार्कमधील सांडपाणी निचऱ्यासाठी नाला खोलीकरण करा ; महापौरांच्या सूचना

 

जळगाव (प्रतिनिधी)  शहरातील बिबा नगर जवळील गौरव पार्क परिसरात असलेल्या एका मोकळ्या प्लॉटमध्ये आजूबाजूच्या सर्व परिसरांचे सांडपाणी जमा होते. नेहमी येत असलेल्या सांडपाण्यामुळे मोठे डबके साचले असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. शनिवारी महापौर भारतीताई सोनवणे यांनी त्याठिकाणी पाहणी करून पाण्याचा निचरा करण्यासाठी तातडीने नाला खोलीकरण करून त्याठिकाणापर्यंत चारी खोदावी अशा सूचना दिल्या आहेत.

 

बिबानगर परिसराजवळ असलेल्या गौरव पार्कच्या एका मोकळ्या प्लॉटवर नेहमी इतर परिसराचे सांडपाणी जमा होते. पावसाळ्यात नागरिकांना याचा मोठा त्रास होतो. सांडपाण्याची दुर्गंधी आणि डास, मच्छरांचा त्रास नेहमीच असतो. नागरिकांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी याबाबत तक्रार केल्याने शनिवारी सकाळी महापौर त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, कुलभुषण पाटील, विजय पाटील, अतुल बारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. परिसरातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर प्रत्यक्षात डबके आणि मागील बाजूने काय उपाययोजना करता येईल यासाठी शेतातून जात पाहणी केली.

 

नाला खोलीकरण तातडीने करावे

बिबानगरातून जात असलेल्या नाल्याचे खोलीकरण करून त्यात डबक्यातील पाणी सोडल्यास ही समस्या सुटू शकते असे प्रभाग अधिकारी उदय पाटील व मनपा अभियंत्यांनी सांगितले. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तातडीने त्याठिकाणी पोकलँन व जेसीबी आणून नाला खोलीकरण करण्याच्या सूचना केल्या. तसेच संबंधित शेत मालकांशी चर्चा करून चारी खोदण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या माध्यमातून पाठपुरावा करावा असेही महापौरांनी सांगितले.

Exit mobile version