Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गोव्यात शिवसेना २५ जागा लढवणार

 

 

पणजी: वृत्तसंस्था | गोव्यात शिवसेना २५ जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसून येत आहे.

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. गोव्यात शिवसेना लढणार आहे. आम्ही गोव्यातील २० ते २५ जागांवर लढणार आहे, असं राऊत यांनी आज स्पष्ट केलं. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं.

 

 

गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गोव्यात एकूण दहा मुख्य राजकीय पक्ष आहेत. तिथे शिवसेनाही गेल्या अनेक वर्षांपासून गोवा विधानसभा निवडणुका लढवत आहे. महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आणि भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेना नेहमीच गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असते. सध्या गोव्यात भाजपचं सरकार आहे. गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी भाजपने मित्रपक्षांसोबत आघाडी बनविण्यात बाजी मारल्याने काँग्रेसला सत्तेपासून वंचित राहावं लागलं आहे.

 

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपला फायदा होऊ नये आणि राज्यात पुन्हा ममता बॅनर्जी यांचं सरकार यावं म्हणून शिवसेनेने हा निर्णय घेतला होता. त्यावर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी जोरदार टीकाही केली होती.

Exit mobile version