गोदावरी अभियांत्रिकीत इंडक्शन प्रोग्रॅमचे डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन प्रोग्रॅमचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील  यांच्याहस्ते करण्यात आले.

 

संस्थेतील प्राध्यापकांशी सुसंवाद निर्माण व्हावा व त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवून घेता यावे या उदात्त हेतूने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी २२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या दरम्यान सात दिवसांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार, २२ रोजी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील  यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील,  डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख, बेसिक सायन्स अ‍ॅण्ड ह्यूम्यानिटीज), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), डॉ.विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर) तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी डॉ. उल्हास पाटील  यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच डॉ. विजयकुमार पाटील (प्राचार्य) यांचा सत्कार डॉ. नितीन भोळे यांनी केला.

कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाला शिकवीत असलेले प्राध्यापक, तसेच सर्व विभाग प्रमुख यांची ओळख नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना करून देण्यात आली, जेणेकरून महाविद्यालयाची असलेली नाड अधिकच घट्ट होईल व परस्पर संबंध जोपासले जातील.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्रा.शफिक अन्सारी ( डेव्हलपमेंट डीन) यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना महाविद्यालयाबाबत विस्तृत माहिती देताना, महाविद्यालयात असणार्‍या सोयी सुविधा तसेच महाविद्यालयात राबविण्यात येणारे वेगवेगळे उपक्रम, त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कौशल्य याबद्दल सांगितले. तसेच महाविद्यालयासोबत त्यांनी गोदावरी फाउंडेशन अंतर्गत असलेल्या इतर संस्थांचीही माहिती दिली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रवर्तन इंडक्शन प्रोग्राम बद्दल माहिती दिली. प्रवर्तन या शब्दाचा सुरेख अर्थ त्यांनी समजावून सांगितला. प्रवर्तन म्हणजे नवीन सुरुवात, आरंभ किंवा कोणत्याही कामासाठी प्रवृत्त करणे असा होय. करिअरच्या सुवर्णसंधी या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकताना, नवनवीन क्षेत्रांमध्ये तुम्ही कसे करिअर करू शकतात व त्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रम याबद्दल सांगितले.

सध्याच्या परिस्थितीत आय.टी. सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना अमाप संधी आहे त्यासाठी लागणारे सॉफ्ट स्किल, विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण यांचा सर्वांगीण विकास या सर्व बाबी वृद्धिंगत करण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. तसेच अभ्यासक्रमाशी निगडित असलेले ऑनलाइन कोर्सेस चे महत्त्व त्यांनी विशद केले. या विद्यार्थ्यांचा चार वर्षाचा आराखडा आत्ताच तयार करुन फक्त विद्यार्थ्यांनी त्या आराखड्यानुसार मार्गक्रमण केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट नामांकित कंपनीत होईल असे सूतोवाच त्यांनी केले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास पाटील सर यांनी समर्पक शब्दात विद्यार्थ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. सर्वप्रथम त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले व गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाबाबत असलेला दृष्टिकोन विचारला. त्यानंतर त्यांनी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व इतर महाविद्यालय यांचा तुलनात्मक अभ्यास विद्यार्थ्यांना स्पष्ट केला व आपल्या महाविद्यालयात असलेली एम्प्लॉयबिलिटी ही इतरांपेक्षा कशी उत्तम आहे याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले.स्वतःमध्ये अमुलाग्र बदल घडवायचे असतील, तर तुमची अभियांत्रिकीची चार वर्षे या महाविद्यालयाला समर्पित करा. त्याच बरोबर शिस्त, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य यावर आपले प्रभुत्व महाविद्यालयीन कालावधीतच विकसित करा.नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देश व विदेश या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाचे ३००० च्या वर माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने तुमचीही नामांकित कंपन्यांचे मध्ये निवड होऊ शकते, फक्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी तयार केलेल्या रोड मॅप वर चालायचे आहे.त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहून नियमित योगाभ्यास करण्यासाठी आवाहन केले.तसेच संपूर्ण कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचे कौतुक केले.त्याचप्रमाणे त्यांनी पालकांशी हितगुज करून त्यांना आश्वासन दिले की, त्यांच्या पाल्यांचे भविष्य हे सुरक्षित हाती आहे. त्यानंतर त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासोबत तसेच पालकांसोबत फोटोसेशन करून त्यांच्याशी जवळीक साधली.सात दिवसांच्या या इंडक्शन प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. सरोज भोळे व प्रा.तृषाली शिंपी यांनी काम पाहिले. तसेच प्रथम वर्ष विभागाचे प्रा.ललिता पाटील, प्रा. संजय चौधरी, प्रा. श्रद्धा वारके यांची मदत या कार्यक्रमासाठी झाली.  सूत्रसंचालन व आभार  प्रा. दिपाली पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉ. नितीन भोळे व प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content