Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेल्या वर्षात देशभरात मोठे परिवर्तन- पंतप्रधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था । विद्यमान केंद्र सरकारच्या दुसर्‍या टर्ममधील पहिल्या वर्षात देशभरात मोठे परिवर्तन आले असून विविध क्षेत्रांमध्ये प्रगती झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनतेशी पत्रातून साधलेल्या संवादात त्यांनी विविध विषयांना स्पर्श करत देश प्रगतीपथावर असल्याचे सांगितले आहे.

आज म्हणजे ३० मे रोजी केंद्रातील मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहून या कार्यकाळातील कामांची माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, २०१४ मध्ये देशातील जनतेने देशात एक मोठे परिवर्तन आणण्यासाठी मतदान केले होते. २०१९ मध्ये तुमचा आशीर्वाद देशाच्या भव्य स्वप्नांसाठी होता. मागील एका वर्षात देशाने कायम नवी स्वप्ने पाहिली, नवीन संकल्प केले, आणि हे संकल्प सिद्धीला नेण्यासाठी निरंतर निर्णय घेत पावले देखील उचलली. राष्ट्रीय एकता-अखंडतेसाठी कलम ३७० असेल, अनेक तपांच्या जुन्या संघर्षाचा सुखद परिणाम राम मंदिर बांधायला परवानगी असेल, तीन तलाक असेल किंवा मग भारताच्या करुणेचे प्रतीक नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, ही सर्व कामगिरी तुमच्याही स्मरणात आहे.

पत्रात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीने भारतालाही विळखा घातला. संकटाच्या या काळात कोणालाही त्रास झाला नाही असा दावा करणं चुकीचं ठरेल. श्रमिक मित्र, प्रवासी कामगार बंधू-भगिनी, छोटया-छोटया उद्योगात काम करणारे कारागीर, स्थानकांवर सामान विकणारे, टपरी -हातगाडी लावणारे, दुकानदार , लघू उद्योजक अशा सहकार्‍यांनी अपरिमित यातना सोसल्या आहेत. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करीत आहोत. आत्मनिर्भर भारत अभियानासाठी दिलेले २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज म्हणजे या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. करोनाच्या संकटात या सर्वांना अपरिमित यातना सोसाव्या लागल्या असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. सोबतच मोदींनी यावेळी भारत पुन्हा एकदा अर्थव्यवस्था सुरळीत करुन जगासमोर एक उदाहरण ठेवत ज्याप्रमाणे करोनाशी लढा देऊन सर्वांना आश्‍चर्यचकित केलं तसंच पुन्हा एकदा करणार असल्याचंही सांगितलं आहे.

Exit mobile version