Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही, देशमुख धमक्या देत देतच गेले — चंद्रकांत पाटील

 

पुणे:  वृत्तसंस्था । खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

 

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळेच सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरूनच उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर ऑक्सिजनबाबत बैठक झाली. मात्र, मोदी फोन उचलत नाहीत असा खोटा आरोप केला जात आहे. हा प्रचार थांबवावा, असं ते म्हणाले.

 

लसीकरणाचा काळाबाजार होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसी वाया गेल्या आहेत. या लसींची श्वेतपत्रिका काढा, असं माझं जाहीर आव्हान आहे. लोक प्रचंड नाराज आहेत. लसीसाठी वणवण भटकत आहेत. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर नवल वाटायला नको. एवढा लोकांमध्ये संताप आहे, असं ते म्हणाले.

 

हरभजन सिंगने मला फोन करून टेस्टिंग व्हॅन देतो म्हणून सांगितलं. मला जर हरभजन सिंग फोन करत असेल तर मुख्यमंत्र्यांना फोन येत नसतील का? लोक द्यायला तयार आहेत. पण सरकार पुढे यायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात? तुम्ही का लोकांशी बोलत नाहीत, असा सवाल पाटील यांनी केला.

 

नगरसेवक निधीतून दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणार आहे. अजितदादांनी आमदार निधीतून हे काम करायला घेतलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. मी कोविडसाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर करतो. ऊर्वरीत दोन कोटीही द्यायला तयार आहे, असंही ते म्हणाले.

Exit mobile version