Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुड न्यूज ! भारतात कोरोनाची पहिली ‘कोवॅक्सिन’ लस तयार

हैदराबाद वृत्तसंस्था । भारत बायोटेक कंपनीने ‘कोवॅक्सिन’नावाची लस तयार केली असून या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता कोरोनाविरोधाच्या लढाईत भारताला मोठे यश आले आहे.

विशेष म्हणजे भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असे नाव देण्यात आले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली आहे. या लसीची जुलै महिन्यात मानवी चाचणी केली जाईल. या लसीची मानवी चाचणी यशस्वी ठरली तर त्याचा फायदा संपूर्ण जगाला होईल.

व्हायरसच्या स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्ही येथे वेगळे करण्यात आले होते. त्यानंतर ते हैदराबादला भारत बायोटेक कंपनीकडे पाठवण्यात आले. तिथे संशोधन केल्यानंतर भारतातील पहिली कोरोना लस विकसित झाली. दरम्यान, “देशातील पहिली स्वदेशी लस आम्ही तयार केली, या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. ही लस तयार करण्यासाठी आयसीएमआर आणि एनआयव्हीने केलेली मदत उल्लेखनीय आहे”, अशी प्रतिक्रिया भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष डॉ. कृष्णा ईल्ला यांनी दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत.

Exit mobile version